MAN-PAKHARU
Sunday, August 16, 2015
नकोचं मजला दया दीनता,
नकोचं मजला भिक..।
हक्क माझा मजला हवा,
नको वरवरचे कवतिक..।।
रो..
तेचं ते जगतांनाही,
गवसतं बरचं काही..।
अश्रूंची बांधता तोरणे,
आनंदही निमूट येई..।।
रो..
पाऊस म्हणाला,
माणसं दरवर्षी रंगपंचमी खेळतात,
अन् वर्षभर रंग दाखवतात..।
आता मी रंगपंचमी खेळणार,
अन् माझे रंग दाखवणार..।।
बसा बघत.....................!!
रो..
आतले अन् बाहेरचे,
प्रत्येकाचे जग वेगळे..।
तुझे जग तुझे,
माझे जग माझे..।।
रो..
आपणचं आपल्याला नावाजी,
म्हणे मस्तानीचा मीचं बाजी..।
थडग्यावरची सुकलेली फुले,
केविलवाणी हसतात..।
पुन्हा फिरुनी जीवन नाही,
हेचं सत्य वदतात..।।
रो..
पुढे काय पुढे काय,
विचार कशाला करित बसावे..।
पुढे पुढे चालत राहून,
आनंदी क्षण वेचून घ्यावे..।।
रो..
निर्झरा सारखे व्हावे मी ही,
अवखळ अन् नितळ निर्मळ..।
वाहूनी जाव्या क्लेशभावना,
निरपेक्ष रहावे निरंतर अंतर..।।
रो..
ओंजळ भरलेलीचं रहाते,
पसायदान करणार्यांची..।
अवघेची दान करतांना,
स्वत्वही त्यागणार्यांची..।।
रो..
नकोत कोणते प्रश्न,
नकोचं कोणती उत्तरे..।
सहज व्हावे स्वीकारणे,
तैसे सहजची जगणे..।।
रो..
एक शून्य,
महाशून्य झालं..।
अवघं गणितचं,
बदलून गेलं..।।
रो..
आपल्या स्वप्नांचंच व्यंगचित्र,
आपल्याला हसतं..।
वास्तवतेचं बोट धरुन,
चालायला शिकवतं..।।
रो..
माझ्याभोवती दरवळे,
तुझा सुगंध..
इकडे तिकडे,
चोहीकडे..
तू असतांनाही,
तू नसतांनाही..।।
रो..
जलातलं प्रतिबिंब,
जलात मिसळलं..।
वलयांकित रेषांत,
अस्तित्व विरलं..।।
रो..
जीवनाच्या फसवेपणाची,
जाणिव होते क्षणात..।
दबका हुंदका दाटे,
रित्या मनाच्या गर्भात..।।
रो
तुझी सोबत म्हणजे,
उन्हातलं चांदण..।
तप्त काहिलतलं,
शितलगार चंदन..।।
रो..
न बोलताही तुला,
सारेचं कसे समजते..।
अन् माझे बोलणे ,
मग 'वटवट' वाटते..।।
रो..
धुमसतचं होता तो,
आतल्या आत..।
बाहेर पडला अन्,
विध्वंस झाला..।।
रो..
अंधाराच्या घुमटातूनी आले,
प्रकाशाचे टिंब टिंब..।
त्यात शोधत बसले,
तुझेचं प्रतिबिंब..।।
रो..
कसं थोपवावं,
मनाच्या झोक्याला..।
चंद्रही बिलगला,
आकाशी झुंबरला..।।
रो..
ओळखीचीचं माणसं,
देवून जातात चकवा..।
फसलेले आपण म्हणतो,
अरेच्या, अरेव्वा! वाहव्वा.. !!
रो..
काळाचा हात फिरता,
सारचं जात पुसून..।
आठवणीचं राहतात,
पापण्या मिटून..।।
रो..
जन्मभर सोसलेल्या कळाही ,
वेदनाचं बहाल करतात..।
राहून गेलेलाचं हिशेब,
अंतःसमयी मांडत रहातात..।।
रो..
निसर्गाचं फूल ,
सुरेखसं बहरलं..।
दानचं महत्व गात,
सहजचं वाहीलं..।।
रो..
प्रश्न
भेदक प्रश्न..।
किती मंथन करायचं???
अन् शेवटी हातात,
फुटकं वाडगचं यायचं..।।
रो..
पुन्हा एकदा फिरुनी आले,
तेचं सुरेख गाव..।
तिथे कुठेचं आढळले नाही,
माझे कोरलेले नाव..।।
रो..
या रंगमंचीय दुनियेत..
जे नसतं,
ते दाखवावं लागतं..।
जे असतं,
ते गुदमरुन गप्प बसतं..।।
रो..
अवेळी पाऊस सखा,
उगीचचं बरसत नाही..।
आभाळाला एकटेपणा,
जराही सहावत नाही..।।
रो..
मृत्यूलाही मृत्यूने,
असं काही कवटाळावं..।
जीवाशिवाच्या जोडीला,
अद्वैताचं रुप यावं..।।
रो..
पंख आहेत,
बळ हवं..।
बळ मिळताचं,
आकाश हवं..।
उंची मोजण्यासाठी ..।।
रो..
शोध घेतेय मैफलीचा,
जी खिळवून ठेवेल..
आतल्या उत्कट स्वरांसह
कायमचे..।।
रो..
काही क्षण वेडे,
काही क्षण खुळे..
आठवणींच्या प्रदेशातले,
सारे क्षण भोळे.. ।
रो..
तू विचारणार नाहीस,
मीही सांगणार नाही..
माझ्या मनाची व्यथा,
आता मांडणार नाही..।।
रो..
पुरे झाली लपाछपी,
समोर ये तर खरा..
आयुष्यावर बोलू काही,
बसोनी निवांत जरा..।।
रो..
गडद अंधारात,
दिशा दाखवतो,
तो ध्रुवतारा..
पण अखेर,
प्रवास हा,
ज्याचा त्याचाचं..।।
रो..
लाभो जाती,
प्राजक्ताची..।
क्षणैक आकंठ,
तृप्तीची..।।
रो..
नकोत नुसत्या गप्पाटप्पा,
नकोत नुसती गाणी..।
कृतीतूनचं चला रोखू या,
पर्यावरणाची हानी..।।
रो..
☺
मी'पण जाते लयाला,
होत जाते बिंदूस्वरुप..।
जाणवते जेव्हा मनाला,
तुझे अवखळ पाऊसरुप..।।
रो..
तुझेचं होते सारे,
तुजला दिधले..।
अस्तित्व हे केवळ,
शुन्याकार उरले..।।
रो..
त्याला नव्हतेचं देणेघेणे,
मी मात्र उधळीत निघाले..।
तो राहीला कोरडाठाक,
मी मात्र सचैल न्हाले..।।
रो..
पाण्यावरची अस्फुट रेघ,
केवळ एक भास..।
पाण्याचीचं खोली जाणे,
अंतरीचा श्वास..।।
रो..
पुढे पुढे करणार्यांची,
शिफारस असते मोठी..।
पडद्यामागे रहाणारे,
जातात वीरगती..।।
रो..
सतत पुढे पुढे जायचे,
किंचीतसे मागे यायचे..।
मागे पुढे करत करत,
लक्ष्य सहजी गाठायचे..।।
रो..
तुझं येणं अन्,
माझं ओलचिंब होणं,
नेहमीचंच..।
तुझं जाणं अन्,
माझं हुरहुरणं हेही,
नेहमीचचं..।।
रो..
फोटोसाठी उठाठेव,
जन्मभरी केली..।
फोटोतचं उरलो,
काळजे दुरावली..।।
रो..
शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ,
सांगूनी गेले रथी-महारथी..।
किंचीतसी शक्कल लढवा,
जे हवे ते मिळते जगती..।।
रो..
भग्न झाले देवालय,
परि ना भग्न झाली मूर्ती..।
आहे अजूनही जीवंत,
ती तशीचं अंतर्यामी भक्ती..।।
रो..
तुझा पाऊस माझा पाऊस,
आला वारा गेला वाहून..।
अंतःगर्भातील कोंबांनी,
ओलावा ठेवलाय जपून..।।
रो..
माझे मातीचेचं गाणे,
माझा मातीचाचं सुर..।
मिटून जाईल मातीतचं,
मनी दाटते काहूर..।।
रो..
ती रेखीव रंगनक्षी,
ते नितळ भावरंग..।
अजूनही नाही पुसले,
ते ओलेती रंगसंग..।।
रो..
नाकाला जीभ लागतं नाही,
हे क्षणिक क्षणात कळलं..
तिथचं माझं बालपण विरलं..।।
रो..
तो येतो - तो जातो,
अस्तित्वाची खूण ठेवून..।
कुसूंबी आकाश मनावर,
इंद्रधनुष्य रेखून..।।
रो..
किर्र झाडीच्या काळखोत,
काजवे प्रकाशले..।
जणू चांदण्यांचे दिवे,
भूवरी उतरले..।।
रो..
काजळल्या दिशा,
मनी दाटे हूरहूर..।
मी असे इथे अन्,
मीचं तिथे दूरदूर..।।
रो..
वारा वाहे झुळझूळ,
वाजवित सुरेल पावा..।
मातीचं गीत ऐकण्यासाठी,
आकाशाचा कान हवा..।।
रो..
काजळकाळ्या अंधारात,
एकदा तरी जावचं लागतं..।
सिद्ध करतांना स्वतःला,
साधलं काय पहावचं लागतं..।।
रो..
स्वप्नांच्या पायर्यांवर,
चांदण्यांचे ठसे..।
उतरतांना बिचारे,
भाबडे मन फसे..।।
रो..
चिंधीला चिंधी जोडून,
एक सुंदर पटका विणला..।
विणून झाल्यानंतर कळलं,
धागाचं होता विटला..।।
रो..
शांत किनार्या सारखं,
किती काळ स्थिर रहायचं..।
कधीतरी लाट होवून,
तुफाणपण उधळून द्यायचं..।।
रो..
मी उगीचचं बसते,
शब्दात सारं रेखीत..।
शब्दही जाती वार्यावर,
हेचं असावे भाकीत..।।
रो..
झाडाची फांदी,
आतून पोखरलेली..।
वादळ आलं,
मोडून पडली..।।
रो
मापता मापाने सारे ,
जाते हरवूनी सौंदर्य..।
ठेव ऐसी जागा,
जेथे नसतील मापदंड..।।
रो
शोध होता अंतर्यामी,
पैलतीरी जावेचं लागणार..।
मार्ग आहे तोचं,
दिशा मात्र भिन्न होणार..।।
रो
वळणाचं पाणी,
वळणाकडं वळतं..।
खळाळतं पाणी,
नदीला जावून मिळतं..।।
रो
नसत्याची नक्षी,
पसरवतं गेले पक्षी..।
निर्वासित झाले सारे,
सत्याचे साक्षी..।।
रो
दोन ध्रुवातले अंतर,
शहारतांना पाहीले..।
गीत अस्फूट मौनाचे,
दशदिशांनी गाईले..।।
रो..
जवळचं ते दिसत नाही,
दूरचं ते पहात रहातो..।
इथचं कुठेतरी नकळत,
माणूस चुकत चालतो..।।
रो..
हवामान बदलत आहे,
घरातल्यांची काळजी घ्या..
भाजीला फोडणी जरा,
झणझणीत तडाखेबंदचं द्या..।।
रो..
पंखातली झेप निमाली,
निजलेल्या पापण्यात..।
घडीचा काळोखी विसावा,
भरारी आकाशात..।।
रो..
एक अंधारी,
गडद काळोखी गुहा..
तू अन मी,
हातीहात राहू दे माझा..
अगदी अंतापर्यंत..।।
रो..
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)